Saturday, 20 January 2018

मामाचा गाव

काय सांगु राव,
ही अशीच हवी वाटणारी सायंकाळची ऊनं
छेदत गेली अंगाला
अन् आठवला मामाचा गाव

काय सांगु राव,
ती शाळेमागची सुगंधी
फुलांची मोठाली झाडं
अन् आठवलं आपसुकच
त्या वडाच्या झाडाच
पोखरलेलं खोड

खरचं मामाचा गाव
इवलीशी मी अन्
इवलीशीच कऊ
आमचा अगदी
इवलाइवलाच खाऊ

काय सांगु राव,
खेळात गोळा केलेल्या
माकडाच्या भाकऱ्या
चकरामागे गावभराचे
रस्ते तुडवत पायाच्या
झालेल्या भिंगऱ्या

काय सांगु राव,
माझ्या मामाचा गाव
तिन्ही सांजेला
अंगनात बसण
अन रातीला
चांदण्यात भिजणं

काय सांगू राव,
आकडी दुधाच्या
गोड चवीचं
ओठावर रेंगाळणं
मुलांच्यासोबत घोळक्यात
माझं ते खिदळणं

आईसोबत पहाटे पहाटेच
धुंडाळलेली रानं
अन अगदी लहानपणीच
ओळखीची झालेली
पळसाची ती पानं
त्या कैऱ्या..
ती करवंदं...
अन आठवले माझी मला
मीच पण
स्वच्छंद...!!!

Wednesday, 15 March 2017

सारं च राहिलं अर्धवट

सारंच राहिलं अर्धवट..
तुला हवी असलेली भेट
मला हवी असलेली
आपल्या नात्याची गाठ

सारं च राहिलं अर्धवट---
किती वेळ मागून घ्यायचा
अन कोणाकडे मागायचा
कोणी विकतंच नाहीये

साऱ्यांना घाई आहे
पुढे जायची
पण तुला माहित आहे
मी तुझ्याशिवाय नाही जायची

पण जेव्हा मी निघून
जाईन टाकून सारं अर्धवट
आपसूकच टळून
जाईल तुझी कटकट!

Monday, 25 April 2016

आताशा शांत आहे सारं

आताशा
तुला पाहताना
हृदयाचे ठोके
चुकत नाहीत

संथ आहे वेग
आठवणींचा
नाही आवेग
भावनांचा

आताशा तुझा
निरोप घेताना
पुढच्या भेटीची
ओढ मनात नाही

गम्मत म्हणजे
असं असल तरी
अजूनही भुमिका
बदलेल्या नाहीत

अजूनही तुच
हट्ट करतोयस
अजूनही मीच
ते पुरवावे अशी
तुझी 'तीच अपेक्षा'

अजूनही तुलाच
खूप काही सांगायचय
अन् मी आजही
फक्त ऐकायचय

एक साम्य आहे
तेव्हाही मी नव्हते
आपल्या नात्यात
आणि आजही नाहीये

फरक एवढाच
तेव्हा तुला मी
नको होते
आणि आज मला मी.

Tuesday, 23 February 2016

सांगाल का कुणीतरी..?

तिच्या स्वप्नातली दुनिया न्यारी
उतरेल का सत्यात खरी
अहो सांगाल का कुणीतरी?

दौडत येईल का राजकुमार
घोड्यावर होऊन स्वार
नेण्या तिला सातासमुद्रापार ?

घेऊन तिला मिठीत अलवार
स्पर्शैल जेव्हा तो तिला हळुवार
होईल का ती लाजुन चुर..?

ओढेल जेव्हा तो तिला समीप
सांगा उजळतील का
तिच्या मनाचे दीप..?

भिडेल जेव्हा नजरेस नजर
दिसेल का डोळ्यात त्याच्या
प्रेमाचा अथांग सागर..?

अहो सांगाल का कुणीतरी
उतरेल का सत्यात खरी
तिच्या स्वप्नातली दुनिया न्यारी...?

Wednesday, 27 January 2016

... पुजती रहेगी तेरी मुरत..!

कैसे बया करु मै अपनी ये चाहत
महसुस कर कभी,
मेरे दिल की धडकन
तेरे बिना दिल को एक पल भी नही राहत

तुझे दिन रात सपनों मे देखु, है ये मेरी फितरत
देखना मेरी आँखो मे कभी,
खुद की तसवीर
पर तु है के तुझे मेरी तरफ देखने की भी नही फुरसत

तेरी खुशी की ही मैने मांगी हमेशा मन्नत
झांकना मेरी रुह में कभी,
शायद तब पता चले
साथ होने से तेरे दुनिया बन गयी थी मेरी जन्नत

एक पल मे तुने बदल दी अपनी सुरत
फिर भी,
तु जान ले के
ये मीरा समझकर तुझे शाम, पुजती रहेगी तेरी मुरत..!

Friday, 27 November 2015

रंग

प्रेम जुमानतं का रंगाला..?
प्रेम.. आंधळच ते...
भुलत नाही ते
चेहर्‍याच्या सुंदरतेला

प्रेम करणाऱ्यांची
दुनियाच रंगीन असते
प्रेमच असते
जे जीवनात रंग भरते

म्हणून काही प्रेम
रंगांधळे नसते
त्यालाही कळतात रंग
रंग मनाचे

दोन रंग वेगवेगळे
एका नव्या रंगाला जन्म देतात
तेव्हा किती सारं प्रेम मिळत
त्या नवजात रंगाला

जर प्रेम जुमानत
असत रंगाला
तर राधा भाळली असती
का कृष्णाला ?

त्याचा काळा अन तिचा
रंग गोरापान असला
तर हमखास
चालतं समाजाला

पण ती सावळी अन
तो गोरापान असला
तर मात्र अडवलं जात
दोन मनांच्या मिलनाला


Thursday, 26 November 2015

फरक

खरचं फरक पडतो का
तो तिला अहो म्हणतो की
अगं म्हणतो याचा

खरचं फरक पडतो का
तो तिच्यापासून कोसो दुर असतो की
तिच्या कुशीत असतो याचा

खरचं फरक पडतो का
तो अनभिज्ञ असतो की
सगळं जाणतो याचा

खरचं फरक पडतो का
तो तिला रुसवतो की
तिचा रुसवा काढतो याचा

खरचं फरक पडतो का
तो तिला रडताना नुसतंच पाहतो की
अलगद नजर दुर भिरकावत
हळुच आवंढा गिळतो याचा

खरचं फरक पडतो का
तिला या बारीक सारीक गोष्टींचा
नाही.. मुळीच नाही पण

त्याच्या क्षणभरही दुर जाण्याने
मात्र तिच जग जणू बदलून जातं
कारण...
त्याच्या नसण्याचा तिला
नक्कीच अवाढव्य फरक पडतो