मी बोलले नाही याआधी कधी
सांगेन सांगेन म्हटलं अन
सांगायच राहूनच गेलं..
जेव्हा तु डायरेक्ट डोळ्यात बघतोस न
तेव्हा हृदयाच्या
कोपर्या न कोपर्याचा ठाव घेतोस
तुझ्या नजरेच तेज मला झेपतच नाही अन
मी उगाच दुर पाहिल्याचे सोंग घेते..
तु खुपच शांत आहेस
माझ्या अवखळ, अस्थिर, चंचल
मनाला वेड लावण्याइतका शांत....
तुझा स्पर्श लोभसवाणा आहे
कित्येक क्षण पुन्हा तो मला
स्वतःची आठवण करून देतो सतत...
तुझी देहयष्टी करारी आहे
तु निघून जाताना तुझ्यावर
स्थिरावतच नाही माझी नजर...
तु म्हणत असशील,
मी हे अस का बोलतेय आज
अरे आम्ही जाणार आहोत आज इथुन
बाबांची बदली झालीय
बदली वगैरे कुठे हातात असते न आपल्या
बघ नं..
माझ्या भावनांनी मैत्रीची प्रेमात बदली केली
मलाही पत्ता लागु न देता...
ए ऐक नं..
तुला सगळ माहीत असतं न..
तु सांग नं..
बदली रद्द नाही का होऊ शकत...?