Saturday, 20 January 2018

मामाचा गाव

काय सांगु राव,
ही अशीच हवी वाटणारी सायंकाळची ऊनं
छेदत गेली अंगाला
अन् आठवला मामाचा गाव

काय सांगु राव,
ती शाळेमागची सुगंधी
फुलांची मोठाली झाडं
अन् आठवलं आपसुकच
त्या वडाच्या झाडाच
पोखरलेलं खोड

खरचं मामाचा गाव
इवलीशी मी अन्
इवलीशीच कऊ
आमचा अगदी
इवलाइवलाच खाऊ

काय सांगु राव,
खेळात गोळा केलेल्या
माकडाच्या भाकऱ्या
चकरामागे गावभराचे
रस्ते तुडवत पायाच्या
झालेल्या भिंगऱ्या

काय सांगु राव,
माझ्या मामाचा गाव
तिन्ही सांजेला
अंगनात बसण
अन रातीला
चांदण्यात भिजणं

काय सांगू राव,
आकडी दुधाच्या
गोड चवीचं
ओठावर रेंगाळणं
मुलांच्यासोबत घोळक्यात
माझं ते खिदळणं

आईसोबत पहाटे पहाटेच
धुंडाळलेली रानं
अन अगदी लहानपणीच
ओळखीची झालेली
पळसाची ती पानं
त्या कैऱ्या..
ती करवंदं...
अन आठवले माझी मला
मीच पण
स्वच्छंद...!!!